पांगरदरवाडी येथिल जिल्हापरिषद शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्तींचा सन्मान:

रिपोर्टर:  जि.प.प्रा.शाळा पांगरदरवाडी येथे आज दि.8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त प्रातिनिधीक स्वरुपात महिला कर्मचारी,सुजाण व शिक्षणप्रेमी महिला पालक,कोवळ्या व निरागस बालकांवर वात्सल्य व मायेचे शिंपण करीत शिक्षणाचा लळा लावणाऱ्या अंगणवाडी ताई,प्रतिकूल परिस्थितीतही प्रपंचाचा गाडा समर्थपणे ओढत मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जीवाचे रान करणारी माऊली,शाळेतील विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी कामातच देव आहे असे समजुन उत्कृष्ट पोषण आहार शिजवून देणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस ताई आणि सावित्रीचा शिक्षणवारसा पुढे चालवणार्या शाळेतील महिला शिक्षिका या सर्व नारीशक्तींप्रती आदर व्यक्त करीत यथोचित असा सत्कार व सन्मान करण्यात आला.
  यावेळी कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका .मिनाक्षी मगर उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापुजनाने करुन करण्यात आली अंगणवाडी ताई इंदूमती शेळके व शिंदेताई,बचत गटाच्या कार्यकर्त्या तसेच जागरुक मातापालक कविता निंबाळकर,लक्ष्मी वाघमारे,रुक्मिण गुंड,शहनाज शेख इ.महिलांचा शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते उचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा आपल्या भाषणातून सांगितली.तसेच सहशिक्षक राजेश धोँगडे,प्रसाद डांगे व शांताराम कुंभार यांनी महिला सबलीकरण,स्री-सुरक्षा,विकासप्रक्रियेत महिलांचे योगदान अशा विविध विषयांना स्पर्श करीत मार्गदर्शन केले.तसेच आजच्या दिनाचे औचित्य साधत दि.8 मार्च ते 22मार्च या कालावधीत राबविल्या जाणाऱ्या ‘पोषण पंधरवड्याची’सुरुवात करीत मुलींचे शिक्षण व आरोग्य तसेच मुलींसाठीचे कायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक पैकेकरी उत्रेश्वर यांची प्रेरणा तसेच सहशिक्षक हर्षवर्धन माळी व अनिल हंगरकर यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page