सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे दोन वर्षात धावणार: नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन: आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

धाराशिव रिपोर्टर

श्री तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर आणण्याच्या कामाला आता मोठी गती मिळत आहे. अवघ्या दोन वर्षांत या मार्गावर रेल्वेगाडी धावताना पहायला मिळणार आहे. नियोजित वेळेच्या आत रेल्वेमार्गाचा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून त्या अनुषंगाने नियोजन पूर्ण झाले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

धाराशिव येथिल शिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत रेल्वे, महसूल, भूमी अभिलेख व वन विभागाची संयुक्त बैठक घेण्यात आली. वरील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या सद्यस्थिती बाबत तपशीलवार माहिती सादर केली. धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला हा प्रकल्प दोन वर्षांच्या आता पूर्णत्वाकडे नेण्याच्या दृष्टीने आमदार पाटील यांनी महत्वपूर्ण सूचना यावेळी दिल्या.

धाराशिव जिल्ह्यातील ४१८ हेक्टर जमिनीचे भूसंपादन रेल्वेमार्ग आणि रेल्वे स्थानकांसाठी प्रस्तावित आहे. भूसंपादनासाठी या जमिनींचा निवाडा ( अवार्ड ) करण्याची प्रक्रिया महसूल यंत्रणेच्या माध्यमातून पुढील दोन महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे ठरले आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक आठवडयाला या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्याबाबत सूचनाही आमदार पाटील यांनी या बैठकीत दिल्या आहेत. ४१८ हेक्टरपैकी ९० टक्के भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया जाहीर केली जाणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

यापूर्वी दि ५ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी चार वर्षांची कालमर्यादा असलेला हा प्रकल्प दोन वर्षाच्या आत पूर्णत्वाकडे नेण्यासाठी कामाचे तीन भाग करून स्वतंत्र निविदा काढण्याबाबत महत्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कामाचे स्वतंत्र तीन भाग करण्यात आले आहेत. धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील कामाचे प्रत्येक एक भाग तर बोगद्याच्या कामाचा तिसरा भाग ठरविण्यात आला आहे. या तिन्ही कामाच्या निविदेमध्ये दोन वर्षांच्या आत काम पूर्ण करण्याची अट प्राधान्याने ठेवण्यात येणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले. धाराशिवकरांसाठी महत्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पाच्या कामाचा आढावा दर महिन्याला घेऊन दोन वर्षांच्या आत हे काम पूर्ण करून घेण्यासाठी आपला सातत्यपूर्ण पाठपुरावा राहील अशी ग्वाहीही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेचे स्वप्न आता पूर्णत्वाच्या टप्प्यात आले आहे.

सदरील बैठकीस सहा.कार्यकारी अभियंता मध्य रेल सोलापूर श्री. राजनारायण भगवानदीप, वरिष्ठ स्तर अभियंता / निर्माण / सोलापूर नुरूस्सलान, उपअधिक्षक भूमी अभिलेख तुळजापूर श्री. साकतकर एस.आर., वनरक्षक व्ही.एस.पाटील यांच्यासह महसूल, भूमी अभिलेख, रेल्वे व वन विभागाचे इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page